रत्नागिरी:- वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण करून समुहशाळा सुरू करण्याची योजना शिक्षण विभागाने निश्चित केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 2446 शाळांपैकी तब्बल 1392 शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर शाळेतील अडीच हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
राज्यातील वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करा आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी समुहशाळा सुरु करण्याचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 1392 शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 10 पटसंख्या असलेल्या 713 शाळा आहेत. त्यामध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक 115 शाळांमध्ये पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. चिपळूणात 89 शाळा, दापोलीत 87 शाळा, गुहागरमध्ये 45 शाळा, मंडणगडमध्ये 62 शाळा, लांजामध्ये 49 शाळा, राजापूरमध्ये 111 शाळा आणि संगमेश्वरमध्ये 104 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे.
वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 679 शाळा आहेत. चिपळूणात 82 शाळा, दापोलीत 76 शाळा, गुहागरात 53 शाळा, खेडमध्ये 95 शाळा, मंडणगडमध्ये 40 शाळा, लांजा 69 शाळा, राजापूरात 17 शाळा, रत्नागिरीत 79 शाळा आणि संगमेश्वरमध्ये 94 शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे.