पालशेत/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत-निवोशी महसूल क्षेत्रातील रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली असून ग्रामस्थ जनतेला फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालशेत -नागझरी रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांनी तर अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची अवस्था हेलकावे लाटांसारखी होत आहे.
मोडकाघर ते पालशेत,अडूर प्रमुख रस्त्याचीही अवस्था बिकट झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते, पालशेत बाजारपेठ खाडी पुलाजवळ पडलेल्या खड्डयांमुळे सदर पुलानजीक मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना व ग्राहकांना ये-जा करणाऱ्या वाहनांकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील चिखल सर्वत्र उडत असल्याने फार मोठया गैरसोयी ला सामोरे जावे लागत आहे. तर पालशेत-निवोशी व पोमेंडी रस्त्यावर अनेक ठिकाणी साईड बांध खचले असून त्याची डागडुजी वेळीच होणे गरजेचे आहे.
कारण साधारण पंधरा- वीस वर्षापूर्वी याच मार्गावर एसटी बस घरून मोठा अपघात झाला होता हे विसरून चालणार नाही. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा वाढणारी झाडी वेळेत तोडली जात नसल्याचे वाहन चालकांकडून बोलले जात आहे. तर पालशेत-नागझरी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी मांडवकरवाडी,आगरवाडी अशा अनेक वाडीवस्तीवरील ग्रामस्थ सक्रिय प्रयत्न करत असून आगामी निवडणूक पूर्व ग्रुप ग्रामपंचायत पालशेत-निवोशी महसूल क्षेत्रातील रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील अशी येथील ग्रामस्थ जनता अपेक्षा व्यक्त करत आहे.