रत्नागिरी:- स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तरीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम रविवारी 1 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
शनिवार 30 सप्टेंबर रोजी ‘कार्यालयांची स्वच्छता’ हा उपक्रम राबविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी कार्यालय प्रमुखांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह आज बैठक झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, पोलीस उप अधीक्षक निलेश माईनकर, ग्रामपंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण तहसिलदार हणमंत म्हेत्रे यांनी संगणकीय सादरीकरण करुन या उपक्रमाची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, प्रत्येक कार्यालय प्रमुखाने शनिवारी कार्यालयाची एक तास स्वच्छता करावी. यात अधिकारी –कर्मचारी यांचा सहभाग असावा. रविवारी 1 तारीख 1 तास, स्वच्छता ही सेवा उपक्रमास स्थाजिकस्वराज्य स्ंस्थांनी योग्य नियोजन करुन पथके बनवावीत.
परिसराची, गावांची स्वच्छता करावी. यात शाळा, अंगणवाडी, बाजारपेठा, समुद्रकिणारे, महाविद्यालय इत्यादी परिसरांची स्वच्छता करावी. यात स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करुन सहभागी करुन घ्यावे. उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना प्रशस्तीपत्रेही देण्यात येतील, असे ही ते म्हणाले.
या बैठकीला प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.