मुंबई:-जुलै महिन्यात इतका पाऊस झाला की, पिके अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे ऑगस्टमध्ये पुन्हा पेरणी केली, पण संपूर्ण महिना कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये तरी वरुणराजा कृपा करेल या आशेवर असलेल्या शेतक-याला पावसाने पुन्हा दगा दिला.
या दुष्काळी परिस्थितीकडे मिंधे सरकारने साफ दुर्लक्ष केले. अखेर वाढत गेलेला कर्जाचा डोंगर, डोळयांदेखत करपू लागलेली पिके यामुळे अनेक शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दरवर्षी शेतक-यांपुढे अडचणींचा डोंगर उभा राहत असून राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै 2023 पर्यंत तब्बल 1 हजार 555 शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे.
राज्यात तब्बल 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट असून 6 जिल्हे हे रेड झोनमध्ये गेल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. शेतकरी प्रचंड संकटात असून दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्विटच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.
राज्यात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून तलाव आटले आहेत. तलावांचे अक्षरशः वाळवंट झाले असून धरणांनीही तळ गाठला आहे. सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण कमीच राहिल्यामुळे राज्यावरील दुष्काळाचे संकट अधिक गडद होत चालले आहे.
अकोल्यात सर्वात कमी पाऊस
राज्यभरात नगर जिह्यात सरासरी 45 टक्के कमी पाऊस झाला, तर सर्वात कमी नांदेडमध्ये सरासरीच्या केवळ 19 टक्के पाऊस झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. सांगलीत सरासरीच्या 45 टक्के कमी, सोलापुरात 35 टक्के कमी पाऊस, साताऱयात 40 टक्के कमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 टक्के कमी, जालन्यात 43 टक्के कमी, बीडमध्ये सरासरीच्या 43 टक्के कमी, धाराशीवमध्ये सरासरीच्या 32 टक्के कमी, परभणीत सरासरीच्या 31 टक्के कमी, अमरावतीत 30 टक्के कमी, धाराशीवमध्ये सरासरीच्या 32 टक्के कमी, अकोल्यात 29 टक्के कमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
शेतक-याचा बँकेतच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
बँकेत अनेक हेलपाटे मारूनही बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याने एका शेतक-याने बँकेत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना हिंगोलीतील औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथे घडली. भुजंग पोले असे या शेतकऱयाचे नाव आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कर्ज मिळवण्यासाठी बँकेत येत होते. परंतु बँकेने कर्ज नाकारल्याने त्यांनी अखेर बँकेतच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता बँक त्यांचा सिबिल स्कोअर खराब असल्याचे कारण देत आहे.
ही प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी – सुप्रिया सुळे
एकीकडे खासगी कंपन्यांचं अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ करायचे आणि जगाच्या पोशिंद्याला शेतीसाठी पैसा देताना ताटकळत उभे करायचे, हा विरोधाभास बरा नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सच्या माध्यमातून दिली. औंढा तालुक्यातील शेतकऱयाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणे हाच महायुतीचा पॅटर्न
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहेत याची शिंदे सरकारला माहिती आहे की नाही, असा प्रश्न आहे. केवळ आश्वासन देऊन शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसून मोकळे व्हायचे, हाच महायुती सरकारचा पॅटर्न आहे, अशी खरमरीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुती सरकारवर ट्विट करत त्यांनी हल्लाबोल केला. शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या वाढल्याचा अहवाल पुढे आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अमरावती विभागात सर्वाधिक 637 शेतक-यांच्या आत्महत्या
कोकण आणि कोल्हापुरात एकही आत्महत्या नाही
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात