नवी मुंबई:-काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या टार्गेटवर असणाऱ्या अदानी समूहाला महाराष्ट्रातल्या महावितरणने बारामती, पुणे आणि कोकणात दोन लाख स्मार्ट मीटर बसविण्यासाठी 13888 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.
अदानी समूहाला गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींनी टार्गेट केले आहे. त्यानंतर आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूह अडचणीत आला. त्यावर समूहाने खुलासा देखील केला, पण हा समूह आजही राहुल गांधींच्या टार्गेटवर कायम आहे.
या समूहाला महाराष्ट्रातील महावितरण कंपनीने 13888 कोटींचे कंत्राट दिले आहे. पुणे, बारामती, कोकण, भांडुप आणि कल्याण या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याचे हे कंत्राट असून अदानींव्यतिरिक्त इतर 4 कंपन्यांनाही महावितरणने अशी कंत्राटे दिली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याची बातमी दिली आहे.
दोन कंत्राटं, लाखो स्मार्ट मीटर!
पुणे, बारामती, कोकण, भांडुप आणि कल्याण या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ही दोन कंत्राटे महावितरणकडून देण्यात आली आहेत. यामध्ये भांडुप, कल्याण व कोकण मिळून एकूण ६३ लाख ४४ हजार स्मार्ट मीटर बसवायचे असून पुणे आणि बारामतीमध्ये मिळून ५२ लाख ४५ हजार स्मार्ट मीटर बसवायचे आहेत. एकूण सहा कंत्राटे महावितरणनेवकडून दिली असून त्यातली 2 कंत्राटे अदानी समूहाला दिली आहेत.
अदानी समूहाने मुंबईच्या बेस्टकडून अशाच प्रकारचे स्मार्ट मीटर बसविण्याचे 1000 कोटींचे कंत्राट मिळविले होते.
सर्वात मोठा स्मार्ट मीटर पुरवठादार
दरम्यान, महावितरणकडून मिळालेल्या या दोन कंत्राटांमुळे अदाणी समूह हा देशभरातील सर्वात मोठा स्मार्ट मीटर पुरवठादार बनल्याचे सांगितलं जात आहे. देशाच्या एकूण स्मार्ट मीटर बाजारपेठेत अदाणी समूहाचा हिस्सा तब्बल 30 % पर्यंत गेल्याचे बोलले जात आहे.
अदानी समूहाव्यतिरिक्त एनसीसीला नाशिक, जळगाव (28.86 लाख मीटर 3461 कोटी) आणि लातूर, नांदेड, औरंगाबाद (27.77 लाख मीटर 3330 कोटी) ही दोन कंत्राटे मिळाली आहेत, तर माँटेकार्लो व जीनस या दोन कंपन्यांना प्रत्येकी एका विभागाचे कंत्राट मिळाले आहे.