दापोली:- दापोलीचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित अतिशय खडतर अशी हाफ आयर्न ट्रायेथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
या हाफ आयर्न ट्रायेथलॉनमध्ये १.९ किमी जलतरण, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश होता.
संपूर्ण देशातील अनेक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. या तीन स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८.३० तासांचा आणि भारतामध्ये १० तास वेळ देण्यात आला होता. मिलिंद खानविलकर यांनी निर्धारित वेळेपूर्वीच फक्त ७ तास १६ मिनिटांत ही ट्रायेथलॉन स्पर्धा पूर्ण केली.
या आव्हानात्मक खडतर स्पर्धेसाठी दोन-तीन वर्षे सरावाची गरज असते. मात्र मिलिंद खानविलकर २-३ महिने तयारी करत होते. आपला व्यवसाय सांभाळत अनेक स्पर्धेत सहभागी होत त्यांनी बक्षिसे पण मिळवली आहेत. तसेच त्यांनी अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्स आणि अडॉक्स इंडिया रँडोनीअर (एआयआर) आयोजित अतिशय खडतर अशा २००, ३००, ४००, ६०० किमी अंतराच्या बीआरएम सायकलिंग स्पर्धा निर्धारित वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण करत, एसआर (सुपर रँडोनीअर) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील किताबही मिळवलेला आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना मिलिंद खानविलकर म्हणाले की स्पर्धांच्या निमित्ताने जी आपण शारीरिक तसेच मानसिक तयारी करतो, त्याचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूरगामी चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मित्रपरिवार जोडला जातो. तसेच लांब पल्ल्याच्या अंतरामुळे आपण निसर्गाची विविध रूपे अगदी जवळून पाहू शकतो. सायकलिंग, रनिंग, स्विमिंग करतेवेळी आपण ज्या तडजोडी करत असतो, त्यातून जो मानसिक कणखरपणा अनुभवायला मिळतो, त्याचा उपयोगही वैयक्तिक जीवनात होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता असणार्यांनी नक्कीच अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. जिद्द माणसाला आत्मिक ताकद देते. कुटुंबीय, मित्र परिवाराचे सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळेच हे आव्हानात्मक यश प्राप्त करता आले, असेही ते सांगतात.