पाचल/नितिश खानविलकर:-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली आहे. शनिवार-रविवार आणि गणपतीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी येत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेपासून जवळ असणारी पाचल बाजारपेठ आजूबाजूच्या ४० पेक्षा जास्त गावांसाठी हक्काची बाजारपेठ आहे.
गावी येणारे चाकरमानी आणि गणेशोत्सवासाठी पाचल बाजारपेठही सज्ज झाली आहे. गणपती सजावटीसाठी लागणारे मखर, विविध प्रकारचे साहित्य, भाजीपाला दुकाने, फुलं दुकाने, पूजा साहित्य, किराणा दुकाने, हॉटेल, जनरल स्टोअर्स यांसाहित सर्वच दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत.
अनेक जादा एस.टी. तसेच खाजगी बसही मुंबईतून याभागात सोडण्यात आल्या आहेत. तसेच अनेकजण वैयक्तिक गाड्यातूनही आपापल्या गावी येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहनांची आणि ग्राहकांची गर्दी होत असून पाचल गावाला शहराचे रूप आले आहे.
होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच इतर अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.