चिपळूण/ओंकार रेळेकर:-अवघ्या दहा वर्षात विविध उपक्रमांनी आणि सार्वजनिक कामामुळे लोकप्रिय झालेल्या शहरालगतच्या खेडर्डी येथील खेडींचा राजा अर्थात विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे दहावे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने. साजरा करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक दशरथशेठ दाभोळकर, अध्यक्ष शशांक भिंगारे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेर्डी येथील हॉटेल मीरा येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत मंडळाच्यावतीने गेल्या दहा वर्षात,तसेच वर्षभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, यंदाच्या गणेशोत्सव मंडळातील कार्यक्रम याबाबतची माहिती दिली.
यावेळी माजी अध्यक्ष प्रशांत दाभोळकर, रियाज खेरटकर, संभाजी यादव, राकेश दाभोळकर, महेश पवार, सचिन भोसले, अजित वाडकर आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून हा गणेशोत्सव
साजरा होत होता. २०१४मध्ये नोंदणीकृत करण्यात आले.
विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्यावतीने केवळ गणेशोत्सव साजरा न करता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. कातकरी पाड्यांवर दिवाळी फराळ पोहोचविण्याचे काम गेली अकरा वर्षे अविरतपणे सुरू आहे. भोस्ते कातकरवाडीमध्ये घरावरील पत्रे, कापड देण्याचे काम मंडळांने केले आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी गुणगौरव सोहोळ्याचे आयोजन केले
जाते. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी साफसफाई मोहीमही मंडळ राबवीत असते. कोरोना काळात मंडळाच्या सदस्यांनी खूप मोठे काम केले. शासकीय कार्यालयांना आरोग्य सुविधा दिल्या गेल्या. २०२१च्या महापुरात मंडळाचे प्रशांत दाभोळकर, अप्पा दाभोळकर यांनी अनेकांचे जीव वाचवले, तर मंडळाच्यावतीने अडचणीत सापडलेल्याना मदत करण्यात आली. २०१८ साली लेदर
बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची
दखल घेऊन शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, मनुष्यबळ विकास अकादमीचा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार मंडळाला मिळाला आहे.
शिस्तबद्ध पद्धतीने गेल्या दहा वर्षांपासून मंडळाचे काम सुरू आहे. यंदाचे दहावे वर्ष असल्यामुळे अनोख्या पद्धतीने यावर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे, असे शशांक भिंगारे यांनी सांगितले. खेर्डी राजाच्या आगमनावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अभिनय स्पर्धा, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, फनी गेम्स, महिलांसाठी विविध खेळ, पाककला स्पर्धा, स्थानिक मुलांचे कार्यक्रम, असे विविध उपक्रम यावर्षी आयोजित करण्यात आले आहेत, शिवाय सत्यवान सावित्री हा चलचित्र देखावा गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहे. सर्व जाती-धर्माची एकात्मता दाखवणारा हा गणेशोत्सव असल्याचे शशांक भिंगारे यांनी सांगितले.