रत्नागिरी:-शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरणाच्या खचणाऱ्या डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंतीचा १४ कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने पाठवला होता.
शासनाने त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून, लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी जी. एच. सलगर यांनी दिली.
रत्नागिरी शहरापासून साडेसहा किमी लांब असलेल्या शीळ धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने ते भाडेतत्त्वावर घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखाचा पाण्याचा कर पालिका पाटबंधारे विभागाला भरते. धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटर आहे. शहराची लोकसंख्या लाखाच्या दरम्यान असून दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणी त्यासाठी धरणातून उचलले जाते. पानवल, नाचणे येथील तलाव सोडले तर पाणीपुरवठ्याचा सर्वांत जास्त भार शीळ धरणावर आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे आणि त्या पाण्यावर पालिकेचे १०० टक्के आरक्षण असलेले शीळ धरण आणखी सुरक्षित होणार आहे.