रत्नागिरी:-पाच वर्षापूर्वी जिल्हा कुठे होता, सद्यस्थितीत कुठे आहे आणि भविष्यात कुठे असेल यावर प्रत्येक विभागाने अभ्यास करावा. जिल्ह्यातील पर्यटन वाढविण्यासाठी काय करता येईल, काजू, आंबा, नारळ यावरील प्रक्रिया उद्योगात कशी वाढ करता येईल, कौशल्यपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन जिल्ह्यातील स्थलांतरण आणि बेकारी कशी कमी करता येईल, या सर्वांचा विचार करुन जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मनिषा कर्णे, प्रा. एस.पी. कुटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळ्ये यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ग्रॉस डिस्ट्रीक्ट डोमेस्टीक प्रॉडक्ट मध्ये वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून सर्व विभागांचे योगदान आवश्यक आहे. त्यादृष्टीने भविष्यकालीन जिल्ह्याचे विकासातील स्थान वाढविण्यासाठी माहिती द्यावी. जिल्हयात पर्यटन वाढ, रिअल इस्टेट मधील संधी, आयात निर्यात, ऐतिहासिक पार्श्वभूमी, परदेशी उद्योग जिल्ह्यात येण्यास वाव, नारळ लागवड, हळद, मसाला लागवड, मत्स्य उत्पादन या सर्वाचा विचार करुन काय नियोजन असू शकते, याचा समावेश हवा.
सामाजिक वनीकरण विभागाने फुलपाखरु उद्यानासह इको टुरिझम उद्यान बनवावे. यासाठी जागेची मागणी करावी. शेळी पालन, कुक्कुटपालन यास चालना देण्यासाठी उत्पादनात वाढ करुन पर्यायाने जिल्ह्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजनांचा विचारही करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. जस्मिन, प्रा. कर्णे, प्रा. कुटे यांनीही मार्गदर्शन करत सूचना केल्या.
भविष्यातील जिल्ह्याचे विकासात्मक स्थान यावर लक्ष केंद्रीत करुन आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी
