चिपळूण/ओंकार रेळेकर:-मुलांना मोबाईल देताना तुमची मुले मोबाईलवर काय पाहतात, याकडे लक्ष द्या असे आवाहन चिपळूण मुस्लिम समाज संस्थेचे उपकार्याध्यक्ष यासीन दळवी यांनी केले.
पोफळी सय्यदवाडी येथील बाबा ग्रुपतर्फे शालेय मुले आणि त्यांच्या पालकांसाठी मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना दळवी म्हणाले, लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलच्या आहारी गेलेले पहायला मिळत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आता चिडचिडेपणा, तासन्तास मोबाईल मध्ये व्यस्त रहाणे, गेम्स खेळत बसणे, अशा एक ना अनेक दुष्परिणामही दिसू लागले असुन, त्यात आणखी एक भर म्हणजे मोबाईलवर वारंवार येणाऱ्या नोटीफिकेशनमुळे अल्पवयीन मुलांचे अश्लीलतेकडे आकर्षण अधिक वाढण्याची शक्यता असुन, यामध्ये आहारी जाण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात मोबाईल देताना ते काय पाहतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या नवीन
समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
लहान वयात मोबाईलच्या माध्यमातून जगभरातील माहिती मिळु लागल्याने, मुले अधिकच स्मार्ट होऊ लागली. पालकांना मुलांच्या या स्मार्टनेसचे अधिकच कौतुक वाटु लागले. पण कोरोनाकाळात गरजेपोटी दिलेला मोबाईल आता मुलांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे.
मोबाईल डेटा सुरू असल्यास येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. नवनवीन ॲप्स डाऊनलोड करताना अथवा नवीन वेबसाईटवर क्लिक करताच ऑनलाइन जाहिरातीच्या अनेक नोटिफिकेशन मोबाईलवर येतात. यामध्ये अश्लीलतेकडे आकर्षण करणाऱ्या नोटिफिकेशन चा देखील समावेश असतो. नकळत मुले यावर क्लिक करतात. एकदा क्लिक केल्यास आपोआप अश्लील जाहिराती, वेबसाईटच्या लिंक, व्हिडिओ मोबाईलवर सातत्याने येतात.
त्यामुळे याचा परिणाम मुलांवर होतो. मुलांना आकर्षित होईल अशा नवीन गोष्टी असल्याने, मुलांचे देखील याकडे आकर्षण वाढते आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर तर मुलांना आकर्षित होईल अशा व्हिडीओचे प्रमाण अधिक आहे. याकडे पालकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत शिक्षकांनी व पालकांनी योग्य मार्गदर्शन केले तर भावी पिढी विकृतीकडे जाणार नाही. अशा घटना दिसुन आल्यास समुपदेशन करावे. कामाव्यतिरिक्त मुलांना मोबाईल देणे टाळावे. सध्याच्या स्थितीला सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात देखील वाढत आहे. यामध्ये देखील लहान मुलांना अडकवले जात आहे. पालकांनी अनावश्यक ॲप्स डिलीट करून, गुगल, क्रोमची हिस्टरी तपासून पाहणे गरजेचे आहे. अशा घटना निदर्शनास येताच वेळीच योग्य ते मार्गदर्शन करावे. असे सांगितले.