कधी ही पडून होऊ शकते दुर्घटना
दुर्घटना झाल्यावरच महावितरण पोल बदलणार का? ग्रामस्थांचा सवाल
गुहागर/उदय दणदणे:-गुहागर तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथे एकूण सहा विद्युत पोल जीर्णवस्थेत आहेत. हे पोल पडून कधी ही दुर्घटना होऊ शकते.
याबाबत ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे दिनांक.०४ ऑगस्ट २०२३ रोजी जीर्ण विद्युत पोल बदलण्या बाबत विनंती अर्ज दिला होता मात्र आज पर्यंत त्यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.
मुख्य डी.पी पासून पहिल्या पोलाला तर तारेचा ताण बांधून झाडाला बांधून ठेवले असल्याचे ग्रामस्थांनी अर्जात म्हटले आहे,तर लाईनवरील दोन पोल पडण्याच्या स्थितीत असल्याने जीवितहानी होण्याचा धोका संभवतो, त्याचबरोबर भेलेवाडी क्षेत्रातील धुमकवाडी वस्तीत एक पोल तर दणदणेवाडी येथील घाणेकर यांच्या घराजवळील दोन पोल असे विविध ठिकाणी एकूण सहा पोल जीर्णवस्थेत असल्याची माहिती अर्जातून महावितरण ला दिली.
निवोशी गावात विद्युत पुरवठा सुरू झाल्यापासून जवळ जवळ ४२ वर्ष होत आले तरी मेन लाईनचे पोल अद्याप बदललेले नसल्याने सदर विद्युत खांबांचा जमिनीपासून चा काही भाग जीर्ण होऊन त्याला सहा इंचाचे भगदाड पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ही बाब पालशेत विभागीय अधिकारी यांच्याकडे तोंडी स्वरूपात वेळोवेळी लक्षात आणून दिलेली आहे, परंतु आता पर्यंत हे पोल बदलण्यात आलेले नाहीत असे ग्रामस्थांनी अर्जात म्हटले आहे.
हा विनंती अर्ज प्रत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पालशेत विभागीय कार्यालय तसेच पालशेत निवोशी ग्रामपंचायत कार्यालय यांनाही देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या निवोशी गावाला अनेकदा चक्रीवादळी वाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे .प्रसंगी सदर झालेल्या चक्रीवादळांमध्ये निवोशी येथे अनेकदा पोल पडून जवळ जवळ एक महिन्यापर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता.प्रसंगी कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ग्रामस्थांना सदर पोल उभे करण्यासाठी श्रमदान करावे लागले होते हे विसरून चालणार नाही. तरी संबंधित अधिकारी यांनी सदर बाब व अचानक येणाऱ्या चक्रीवादळे व त्यातून निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन निवोशी ग्रामस्थांच्या सुरक्षा हेतू सदर धोकादायक झालेले पोल लवकरात लवकर बदलून ग्रामस्थांना दिलासा द्यावा. असे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.