दापोली:- शहरात भटक्या कुत्र्यांचा सगळीकडेच वावर वाढला आहे. शहरात वावर वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या वावराचा बंदोबस्त करण्यास नगर पंचायत प्रशासनाला अपयश आले आहे. नागरिकांना लहान-मोठ्या कामांसाठी शहरात जावे लागते पण कुत्र्यांच्या वावराने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दापोली शहरातील मुख्य मार्गावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शिवाय शहरातील नगर पंचायतीचे प्रशासकिय कार्यालय असलेल्या ईमारती समोरील रस्त्यावर, शिवाजीनगर, नवभारत छात्रालय, कोकण कृषी विदयापीठाकडे जाणारा बुरोंडी मार्ग, कोकण कृषी विदयापीठाची वसाहत, बाजारपेठ, कोकंब आळी, झरी आळी, प्रभु आळी,परबनाका, केळसकर नाका, गाडीतळ, मच्छि मार्केट, फॅमिली माळ, पोस्ट गल्ली, काळकाईकोंड, भारतनगर, खोंडा, उदय नगर, वडाचा कोंड, नर्सरी रोड, नवानगर, कामगार गल्ली, पोलिस स्टेशन मार्ग, आझाद मैदान, टांगर गल्ली, उदय नगर आदी विविध ठिकाणच्या शहरातील रस्त्यावर मोठया प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्तोरस्ती ठाण मांडून बसलेल्या कुत्र्यांची टोळधाड अचानकपणे दुचाकीवरून जाणा-यांच्या भुंकत मागे लागते, ही कुत्र्यांची टोळधाड पादचा-याचीही पाठ सोडत नाहीत.
वेळी अवेळी जोरजोराने भुंकणे, कुत्र्यांच्या भुंकण्याने अनेकांची झोपमोड होते. मोकाट उनाड कुत्र्यांचा केवळ शहरातील नागरिकानाच उपद्रव होत आहे असे नाही तर शहरात विविध कामांसाठी दाखल होणा-यांना याचा फारच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी पहाटेच्यावेळी एस.टी.स्टॅंड परिसरात वावरणा-या कुत्र्यांनी अनेक प्रवाशांना चावा घेत आपली दहशत माजवली आहे. तसेच दुचाकीस्वारांच्यामागे कुत्र्यांनी पाठलाग केल्याने कित्येक दुचाकीस्वार आडवे पडल्याने गंभीर दुखापती झालेल्या आहेत. असे असताना आपल्या शहराच्या कार्यक्षेत्रात वाढलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतानाच्या हालचाली चूकूनही नगर पंचायत प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. कोणाचा जीव गेल्यावरच नगर पंचायत प्रशासन जागे होणार आहे का ? अशाप्रकारचा संतप्त सवाल स्थानिक रहीवाशी लोकांकडून उपस्थित होत आहे.