चिपळूण:-कोकण रेल्वेमार्गावरील सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांनी पसंती दिली आहे.
आरामदायी, वेगवान आणि किफायतशीर दरात नागरिकांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वे मंत्रालयाने ”मेक इन इंडिया” अंतर्गत ”वंदे भारत” एक्स्प्रेसची निर्मिती केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत. सध्या मध्यरेल्वेवर सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या चारही गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे रेल्वेच्या महसुलातदेखील भर पडत आहे. १५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान चार वंदे भारत एक्स्प्रेसच्या सीएसएमटी ते मडगाव एकूण २२ फेऱ्या झाल्या. सीएसएमटी ते मडगाव ५ हजार ३६७ लोकांनी प्रवास केला तसेच मडगाव ते सीएसएमटी ४ हजार ४०२ लोकांनी प्रवास केला. यामधून रेल्वेला १ कोटी ४८ लाख ५२ हजार ३७४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि रत्नागिरी येथील रेल्वेस्थानकावर ही रेल्वे थांबते. चिपळूण रेल्वेस्थानकावर या रेल्वेला थांबा मिळावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे चिपळूणसह गुहागर-संगमेश्वर आणि निम्म्या खेड तालुक्यातील प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याकरिता चिपळूणला येतात. त्यामुळे चिपळूण रेल्वेस्थानकावर वंदे भारतला थांबा मिळाला तर रेल्वेच्या उत्पन्नात अधिक भर पडेल.
महिनाभरात वंदे भारत एक्स्प्रेसमधून ९ हजार ७६९ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून रेल्वेला १ कोटी ४८ लाख ५२ हजार ३७४ रुपयांचा महसूल मिळाला. चिपळूण रेल्वेस्थानकावर या रेल्वेला थांबा मिळाला तर रेल्वेच्या उत्पन्नात अधिक भर पडेल, अशी प्रवाशांची मागणी आहे.