देवरुख:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागाच्या ‘अस्पिरांट्स : पॅशनाटेली इगनायटेड ड्रीम्स’ (न्यूज इ – बुकलेट) आणि ‘द इंग्लिश कॉरिडॉर’ (यूट्यूब चॅनल) या उपक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. इंग्लिश भाषा कार्यात्मक पद्धतीने समजणे व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव मिळावा यासाठी हा उपक्रम इंग्रजी विषयाच्या प्रा. स्वप्ना पुरोहित आणि प्रा. दिवाकर पाटणकर यांनी राबवला आहे.
प्रथम वर्ष, कला या वर्गातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे प्रसार माध्यमांसाठी आवश्यक विविध कला व कौशल्याची ओळख यामुळे होणार आहे. अस्पिरंट्स हे ई-बुकलेट प्रत्येक महिन्यात प्रकाशित होणार आहे, तर यूट्यूब चॅनलद्वारे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबर इंग्लिश भाषेच्या प्रात्यक्षिक अनुभवांद्वारे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अवगत करता येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. दिवाकर पाटणकर यांनी या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा लाभलेला उत्स्फूर्त सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला कौतुकाची छाप दिली. वैविध्यपूर्ण इंग्रजी साहित्याचे वाचन, मनन व चिंतनाचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात व अभ्यासात असणारे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांसह प्रा. स्नेहलता पुजारी, डॉ. वर्षा फाटक, प्रा. विकास शृंगारे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. मंदार जाखी, प्रा. ललिता तांबे, प्रा. प्रतीक्षा मोहित, प्रा. अमृता दांडेकर आणि प्रा. ओंकार परकर हे उपस्थित होते.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात न्यूज ई-बुकलेट आणि यूट्यूब चॅनलचा शुभारंभ
