चिपळूण/ओंकार रेळेकर:-चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता संभाळतानाच आतापर्यंत जनसेवेची कामे देखील केली आहेत. कोरोना काळ, असो अथवा महापूर असो या कालखंडात समाजपयोगी उपक्रम राबवण्यात आले. आता तर गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबवण्यात आले असून आजचे रक्तदान शिबिर म्हणजे ईश्वरी कार्य आहे असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी व वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आयोजित रक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था व वाशिष्ठी मिल्कने यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड. इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड सेंटर, रत्नागिरी. श्री. स्वामी समर्थ ब्लड बँक -बीकेएल वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या सौजन्याने सहकार भवनात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह डॉ. सतीश देसाई, डॉ. अमरसिंह पाटणकर, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. ओमकार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर रक्तदात्यांनी रक्तदान देऊन शिबिराला सुरुवात झाली. तर या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीच्या उपक्रमांना तुमच्या सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने सर्वच उपक्रम यशस्वी झाले असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. सहकारात सांघिकतेची गरज असून सहकार हा समृद्धीचा एकमेव मार्ग असल्याचे यावेळी स्पष्ट केले. चिपळूण नागरीने आर्थिक व्यावसायिकता सांभाळतानाच जनसेवेची कामे केली आहेत. कोरोना काळ असो अथवा महापूर असो या कालखंडात चिपळूण नागरीने सामाजिक बांधिलकीतेला प्राधान्य दिले आहे, असे यावेळी ते म्हणाले. तर मागील काही महिन्यात चिपळूण नागरीच्य निवडणुकीत सभासदांच्या माध्यमातून या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याचे, यावेळी सांगितले. भविष्यकाळात चिपळूण नागरी आपली उद्दिष्ट, संकल्प तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. सतीश देसाई यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत चिपळूण नागरीला ते आणखी उंचावर नेतील, असा विश्वास व्यक्त केला. चिपळूण नागरी व वाशिष्ठी मिल्कने रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सदरील शिबिर मोठ्या प्रमाणात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात होत असावे, असा विश्वास व्यक्त करताना एखाद्या माणसाचा जीव वाचवण्याची क्षमता रक्तामध्ये असते. यामुळे रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. रक्तदान व आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रम भक्तीचा मार्ग दाखवणारे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
डॉ. अभिजात सावंत यावेळी म्हणाले की, चिपळूण नागरी व वाशिष्ठी मिल्कने रक्तदानाचा उत्तम उपक्रम राबवला आहे. रक्तदान शिबिर सर्वोत्तम श्रेष्ठ कार्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन ब्लड बँक असला तरी आणखी एका ब्लड बँकेची गरज असल्याचे नमूद करताना यासाठी चिपळूण नागरीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व या कामासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही यावेळी दिली.
रक्तदाते शिबिरार्थी पत्रकार सुभाष कदम, दीपक शिंदे, ओंकार रेळेकर, रमण डांगे, प्रथमेश जोशी, सुयोग कदम, जयवंत मराठे, प्रकाश माने, शैलेश दांडेकर, दिगंबर सुर्वे, आनंदा जाधव, जितेंद्र पाटील, आनंद जाधव, सुनील ठसाळे, अक्षय भालेकर आदी शिबिरार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याचबरोबर यशवंतराव चव्हाण ब्लड बँक- कराड, इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड सेंटर- रत्नागिरी, श्री स्वामी समर्थ ब्लड बँक बीकेएल वालावलकर हॉस्पिटल, डेरवण या ब्लड बँक यांच्या प्रतिनिधींचा व या रक्तदान शिबिराला सहकार्य करणारे अमोल टाकळे यांना देखील सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालना दरम्यान चिपळूण नागरीने गेल्या काही दिवसात राबवलेल्या उपक्रमाना आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे सर्वच उपक्रम यशस्वी होऊ शकले. या रक्तदान शिबिरासाठी ३६० शिबिरार्थ्यांची नोंद झाली असल्याचे यावेळी नमूद केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्नायादव व वाशिष्ठी मिल्कचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.