सिंधुदुर्ग:-कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शासकीय सार्वजनिक ग्रंथालयात तयार केलेला स्पर्धा परीक्षा विभाग व स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे (ई-लायब्ररी) लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या केंद्रामुळे कुडाळ शहराबरोबरच अन्य तालुक्यांतून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना सहजगत्या दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
शासकीय ग्रंथालयात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आ. निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट, अक्षता बांदेकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कुडाळ सार्वजनिक ग्रंथालयाला १६३ वर्षांचा समृद्ध वारसा आहे. या ठिकाणी सुरू झालेल्या केंद्रामुळे कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध होतील. नव्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामध्ये संगणक व्यवस्था, आसन व्यवस्था, मोफत इंटरनेट, ऑनलाइन अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन प्रोजेक्टरची सुविधा, ई-बुक्स, आदी विविध सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रंथालयांचे रूप हळूहळू बदलत आहे. ग्रंथालयांच्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीमध्ये अतिशय सकारात्मक पद्धतीने सुधारणा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले `डिजिटल इंडिया’चे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
कै. वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम स्तुत्य आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून बदलत्या जगातील घडामोडींसह सामान्य ज्ञान वाढविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षणमंत्री केसरकर यांनी केले.
यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी ई-लायब्ररी महत्वपूर्ण ठरेल. त्याचा कुडाळ शहर, तालुका व लगतच्या भागातील विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आ. निरंजन डावखरे यांनी केले. कुडाळप्रमाणे कोकणातील आणखी सात शहरांतील सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.