मंडणगड:-रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील कोकणच्या विकासात भर घालणाऱ्या अत्यंत महत्वाच्या अशा बाणकोट पुलाचे बांधकाम रखडल्याने कोकणच्या विकासाला चांगलाच खो बसला आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील बाणकोट पुलाचे 12 नोव्हेंबर 2012 ला सुरू झालेले बांधकाम गेल्या 5 वर्षापासून पूर्णपणे थांबले आहे.
मात्र, थांबलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्याची धमक ना प्रशासन दाखवत ना लोकप्रतिनिधींना पुलाच्या बांधकामाचे काही पडले आहे. त्यामुळे यावर्षी पूल बांधून पुर्ण होईल, पुढील वर्षी पुलाचे बांधकाम पूर्ण होईल या भाबड्या आशेवर अवलंबून राहिलेल्या कोकणवासीयांना पुलाच्या आश्वासनाचे गाजर दाखवत भाजपा प्रणित मर्जी सरकारचे कोकण विकासाचे धोरण हे फक्त आणि फक्त कागदावरच असल्याचे दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट खाडीत होणाऱ्या व रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा बाणकोट पुलाच्या बांधकामामुळे कोकण विकासाच्या प्रगतीचे खऱ्या अर्थाने महाद्वारच उघडले जाणार आहे. त्यामुळे या पुलाची उपयोगिता किती मोठी आहे. याची प्रचिती ही सागरी महार्गावरील वाहतुकीनंतर सर्वाच्या लक्षात येणार आहे. अशा या पुलाचे सुरू झालेले बांधकाम हे गेल्या 5 वर्षापासून अर्धवट स्थितीत राहिल्याने कोकण विकासाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
बाणकोट बागमांडला पुलाच्या बांधकामाचा पायाभरणी समांरभ हा तत्कालीन बांधकाम मंत्री, अर्थमंत्री आदींच्या उपस्थितीत 12 नोव्हेंबर 2012 मध्ये संपन्न झाला. या पुलामुळे बाणकोट येथील हिंमतगड या ऐतिहासिक किल्ल्यासह कासवाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळासचे पर्यटनदृष्टया असलेले महत्व अधिक वाढणार आहे. तर दक्षिण काशी गणले गेलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरचे या पुलामुळे पर्यटनदृष्ट्या अधिक महत्त्व वाढणार आहे. मात्र पुलाच्या बांधकामाची परिस्थिती गेल्या 5 वर्षांपासून जैसे थेच असल्याने कोकण विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पुलाच्या बांधकामास चालना द्यावी असे अजिबातच वाटत नाही ही खरी कोकणवासीयांची खरी शोकांतिका आहे.