सुमारे 15 लाखांची वसुली
देवगड:- उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर- देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एन. बी. घाटगे यांच्या हस्ते झाले.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा 1251 प्रकरणांपैकी एकूण 101 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून 14 लाख 90 हजार 424 रूपये इतकी वसुली झाली.
तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. देवानंद गोरे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अविनाश माणगावकर, अॅड. प्रकाश बोडस, अॅड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, ॲड. इंद्रनील ठाकुर, अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. प्रसाद करंदीकर, अॅड. अभिषेक गोगटे, अॅड. आशिष लोके, अॅड. आरती खाडीलकर, अॅड. मैथिली खोबरेकर, अॅड. जाधव, अॅड. देवगडकर, अॅड. साटम, अॅड. सिद्धेश माणगावकर, अॅड. आरती दामले, अॅड. अमेय गुमास्ते यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण 374 दावे ठेवण्यात आले. त्यातील 36 खटले निकाली काढण्यात आले. यातून 9 लाख 8 हजार 198 रूपये इतकी वसुली झाली. तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगर पंचायत, महावितरण यातील 877 इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 65 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण 5 लाख 82 हजार 226 रूपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. मैथिली खोबरेकर यांनी काम पाहिले.