चिपळूण/ओंकार रेळेकर:- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७६ वाढदिवसानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था व वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजतासहकार भवन बहादूरशेखनाका येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता सांभाळताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. नुकतेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे मोफत अस्थिरुग्ण तपासणी शिबिर सहकार भवनात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अस्थि रुग्णांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले आहे.
तसेच आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष व सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संस्थेच्या सहकार भवन सभागृहात ‘अत्रे माहित असलेले नसलेले या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला देखील श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ व अत्रेंचे साहित्यिक, कवी, नाटककार, पत्रकार, संपादक, शिक्षण तज्ञ, विनोदी लेखक, वक्ते, कथाकार, अभिनेते चित्रपट निर्माते दिग्दर्शक पुढारी राजकारण या क्षेत्रातील योगदानाची माहिती मिळाली. या व्याख्यानामुळे आमच्या ज्ञानात भर पडली, अशी भावना श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केली.
तर आता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण ब्लड बँक- कराड, इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड सेंटर- रत्नागिरी, श्री स्वामी समर्थ ब्लड बँक- बीकेएल वालावलकर हॉस्पिटल डेरवण, यांचे सहकार्य मिळणार आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.