खेड : गणरायाचे आगमन अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशभक्तांना आतापासूनच गावचे वेध लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
त्यात मध्य, कोकण रेल्वेच्या २५७ गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या ५५ फेऱ्याही गणेशभक्तांच्या दिमतीला आहेत. १३ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी गणपती स्पेशलला पहिला मान मिळणार आहे. महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांनी यंदाही रेल्वेगाड्यांनाच सर्वाधिक पसंती दिली आहे.
गणरायाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, बोरिवलीसह पुणेस्थित चाकरमान्यांना आतापासूनच गावचे वेध लागले आहेत. महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांतून अडथळ्यांची शर्यत पार करण्याऐवजी गणेशभक्तांनी यंदाही कोकण रेल्वेचाच आधार घेतला आहे. गतवर्षी लाखभर चाकरमान्यांनी गणपती स्पेशलने प्रवास करत गाव गाठले होते. यावर्षी यंदाही रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी ३१२ गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये २५७ मध्यरेल्वेच्या तर ५५ पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांचा समावेश आहे. यात ९४ अनारक्षित फेऱ्याही समाविष्ट आहेत. आतापर्यंत तब्बल १ लाख १० हजार चाकरमान्यांची तिकिटे निश्चित झाली आहेत. हजारो गणेशभक्त अजूनही प्रतीक्षा यादीवरच आहेत. याचमुळे कोकण मार्गावर आणखी गणपती स्पेशल गाड्या चालवण्यासाठी गणेशभक्तांकडून आग्रह धरला जात आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्लच झाल्याने सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा उत्तम पर्याय गणेशभक्तांसाठी उपलब्ध झाल्याने गाव गाठताना कराव्या लागणाऱ्या कसरतीला ”ब्रेक” लागला आहे. आलिशान वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास महागडा असतानाही गणेशोत्सवातील १० दिवसांचे आरक्षण फुल्लच झाले असून. प्रतीक्षायादीनेही २५०चा टप्पा पार केला आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या गणपती स्पेशल १३ सप्टेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत. २० डब्यांच्या गणपती स्पेशलला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी स्थानकात थांबे आहेत.
कोकणात १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान जाण्यासाठी व २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मुंबईला येण्यासाठी कोणत्याही गाडीमध्ये आरक्षित तिकीट उपलब्ध नाही. त्यामुळे आणखी विशेष गाड्या प्रामुख्याने वातानुकूलित व दक्षिणेकडे जाणाऱ्या ज्या केवळ रत्नागिरी व मडगाव येथे थांबतात, अशा गाड्यांना रोहा ते रत्नागिरी व रत्नागिरी ते सावंतवाडी दरम्यान आलटूनपालटून एकेक थांबा देण्यात यावा.