रत्नागिरी : मुंबई-गोवामहामार्गावर गौरी गणपती सणाच्या कालावधीत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला ३० सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरपासून साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त कोकणात येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, वाहतुकीला अडथळा होऊ नये, यादृष्टीने मुंबई-गोवावर होणारी अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार, मुंबई-गोवा महामार्गावर ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत म्हणजेच गणेशोत्सवाची सांगता होईपर्यंत जड-अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा आदेश दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सिजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून अन्य वाहनांसाठी असेल. मात्र, अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका, एसटी महामंडळ बसेस, आराम बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना ही बंदी लागू असणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.