रत्नागिरी:- रा.प. महामंडळाची प्रतिष्ठेची व कोकणवासीय गणेशभक्तांची जिव्हाळ्याची गणपती जादा वाहतूक सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, ठाणे,पुणे इत्यादी मार्गावर गणेश भक्त प्रवासांच्या सोईसाठी एसटी बसेसमधुन जादा वाहतूक करण्यात येणार आहे.
त्यासाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाने पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे.
मुंबईकडून रेल्वेने येणाऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्रवासांच्या सोईसाठी 14सप्टेंबरपासून रत्नागिरी रहाटघर बसस्थानकातून सुटणा-या राजापूर, देवरूख, लांजा या मार्गावर जाणाऱ्या सर्व ग्रामीण फेऱ्या या व्हाया रत्नागिरी रेल्वे स्टेशन करून पुढे मार्गस्थ होणार आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर गणेशभक्तांच्या सोईसाठी 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रत्नागिरी आगाराकडून तात्पुरत्या स्वरूपाचा वाहतूक नियंत्रण कक्ष उभारून तेथे प्रवाशांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. गणपती परतीची जादा वाहतूक 23 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 कालावधीत रत्नागिरी विभागातील सर्व आगाराकडून करण्यात येणार असून प्रवासांच्या मागणीप्रमाणे ग्रुप बुकिंग असल्यास इच्छीत ठिकाणापासून 42 आसनांची गाडी उपलब्ध करून देण्यात येईल. परतीच्या जादा वाहतूकीचे आगाऊ आरक्षण ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध असून सदर सुविधा सध्या विभागातील सर्व आगारात, बस स्थानकावर संगणकीय प्रणालीमार्फत आरक्षण खिडकीवर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील 48 खाजगी आरक्षण एजंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रवासी स्वतःच्या इंटरनेट प्रणालीमधून एमएसआरटीसी रिझर्वेशन ॲप हे प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून स्वतःदेखील त्याद्वारे आपले आगाऊ आरक्षण तिकीट बुकिंग करू शकतात.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी महामंडळाच्या विशेष सवलत योजना 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट गावामधुन मुंबई पर्यंत बस उपलब्ध करून देण्यात येईल. गणेश भक्त प्रवाशी वर्गासाठी यंदा प्रथमच महिलावर्ग 50 टक्के तिकीट व 75 वर्षावरील नागरिकांना शून्य दरात आरामदायी व सुरक्षित प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 75 वर्ष पुर्ण असलेल्या सर्व प्रवाशांना रा.प. बसमधुन 100 टक्के मोफत प्रवास. सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के तिकीट दरात सवलत. 65 वर्ष पूर्ण असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना रा.प.बसमधून 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे.