इंदापूर:-दहा वर्षांपासून लटकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला वेग आला असला तरी कासू-इंदापूर या पट्टय़ातील महामार्गाचे काम पेव्हर मशीन बंद पडल्याने ठप्प झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने पाठपुरावा करत बंद पडलेले मशीन तत्काळ दुरुस्त करण्यास भाग पाडले.
त्यामुळे ठप्प झालेले महामार्गाचे काम पुन्हा सुरू झाले असल्याने गणेशोत्सवापूर्वी एका लेनचे काम पूर्ण होऊ शकणार असल्याने कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे लटकलेले काम वेगाने व्हावे, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्यांचा प्रवास चांगला व्हावा म्हणून ऍड. ओवेस पेचकर, कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, सामाजिक कार्यकर्ते काका कदम, दीपक चव्हाण, अनिल काडगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांकडून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांबरोबरच प्रशासन आणि ठेकेदाराकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानुसार कासू ते इंदापूर दरम्यान महामार्गाचे काम वेगात सुरू होते. मात्र पेव्हर मशीन बंद पडल्यामुळे सदरचे काम गेल्या तीन दिवसांपासून बंद पडल्याचे समजताच काका कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांनी धाव घेत टोल इफ्रास्ट्रक्चरचे अधिकारी गुप्ता यांना संपर्क साधत बंद पडलेली मशीन तत्काळ सुरू करून काम सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधितांनी बंद पडलेली मशीन रविवारी काका कदम यांच्या उपस्थितीत दुरुस्त करून प्रत्यक्ष काम सुरू केले. कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून काका कदम आणि त्यांचे सहकारी सातत्याने सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात राहून महामार्गाचे काम वेगाने व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत.
कामातील त्रुटी दाखवून तत्काळ सुधारणा
महामार्गाचे काम वेगात सुरू असल्याने अनेक ठिकाणी त्रुटी राहत आहेत. त्यामुळे आम्ही कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, ऍड. ओवेस अनवर पेचकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाहणी करतो. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास आम्ही त्याचे फोटो, व्हीडीओ संबंधितांना पाठवून ते त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतो असे काका कदम यांनी सांगितले. त्याच्यासोबत विजय पवार, उदय सुर्वे, ऍड. प्रथमेश रावराणे, राजू मुलुख, संतोष गुरव, हरिश्चंद्र शिर्के, मुरलीधर शिरगावकर, नरेश पेडणेकर, प्रकाश तोरसकर, शंकर उंबळकर, रूपेश धाडवे हेही काम करत आहेत. त्यांनी नुकतीच फळस्पे, कर्नाळा, पेण, वडखळ, कासू, नागोठणे, वाकन फाटा, कोलाड, इंदापूर या परिसरातील कामाची पाहणी केली.