दापोली:- शिक्षकांवर लादले जाणारे उपक्रम, शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून मागितली जाणारी माहिती, एका लोकप्रतिनिधीकडून शिक्षकांच्या घरभाड्यावर होणारी टीका, हजारो शाळेत शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य वर्ग नाहीत, शासन शिक्षकांच्या पाठीशी उभे रहात नाही यासर्व गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सामुहिक किरकोळ रजा आंदोलन करणार आहेत.
दापोलीत श्री मंगल कार्यालयात गुणगौरव समारंभात बोलत असताना शिक्षक समितीचे राज्यनेते उदय शिंदे यांनी आपल्या भाषणात ही माहिती दिली. येत्या 5 संप्टेबर रोजी ‘शिक्षक दिनी’हे आंदोलन केले जाणार आहे.
दापोलीतील गुणगौरव समारंभात बोलत असत उदय शिंदे म्हणाले की, एक लोकप्रतिनिधी उठसुठ शिक्षकांचा घरभाडे भत्ता, ८०% शिक्षक भ्रष्टाचारी आहेत अशा वल्गना करत असताना शासन म्हणून कुणीही प्राथमिक शिक्षकांच्या पाठीमागे उभे राहत नाही. राज्यातील हजारो शाळेत आज शिक्षक नाहीत. विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य इमारती नाहीत. शिवाय वेगवेगळे एनजीओ शासनाची कोट्यावधी रुपयांचा निधी उकळण्यासाठी शाळांमध्ये उपक्रम राबवून शिक्षकांना वेठीस धरतात आणि उलट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्ता नाही अशा प्रकारचे अहवाल सादर करतात. असे ते यावेळी म्हणाले. शिक्षकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि कमालीचे औदासिन्य असलेल्या शासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेऊन शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ रजेची नोटीस ११ ऑगस्टला शासनाला दिली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून शिक्षक दिनाच्या दिवशी हे आंदोलन होत आहे याचा अर्थ शिक्षक समिती शिक्षक दिनाचे महत्त्व ओळखत नाही असा होत नाही. यापूर्वीची आंदोलने शिक्षक दिनाच्या दिवशी झालेली नाहीत का? हे इतिहासात तपासून पाहिलं पाहिजे? शिक्षक समितीला शिक्षक दिनाच्या दिवशीच आंदोलन करण्याची गरज का भासली याचा विचार व्हावा. यापूर्वीचे आंदोलन नुकतंच १५ जुलैला आम्ही केले होते असेही शिंदे म्हणाले. याप्रसंगी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,राज्य सल्लागार विजयकुमार पंडित,कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे,राज्य कार्यकारणी सदस्य अंकुश गोफणे जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव ,जिल्हाध्यक्ष उर्दू शिक्षक संघटना मुश्ताक तांबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ प्रवीण काटकर,अध्यक्ष शिक्षक पतपेढी विलास जाधव उपस्थित होते.