कोल्हापूर:-कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील जुळेवाडी (ता.शाहूवाडी) खिंडीत रविवारी (दि ३) पहाटे गॅस टँकर पलटी झाला. टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे बांबवडे ते मलकापूर रस्ता वाहतुकीस पोलिसांनी बंद केला होता.
या अपघातात चालक जाऊल हक ( वय ३५, रा. झारखंड ) हा किरकोळ जखमी झाला आहे. टँकर ( के ए o१ ए एल ८३७९ ) रत्नागिरीहून गॅस भरून बेंगलोरकडे जात होता. जुळेवाडी खिंडीतील तीव्र वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी झाला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्यासह शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बांबवडे ते मलकापूर दरम्यानची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. मलकापूर-शिरगाव-शिंपे-सरूड-बांबवडे मार्गे तसेच कोकरूड पूलावरून रत्नागिरीकडे वाहतूक वळविण्यात आली होती. शाहूवाडी पोलिसांनी मलकापूर-बांबवडे येथे बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, घटनास्थळी मलकापूर नगरपालिकेचा अग्निशामक बंब व १०८ रूग्णवाहिका तैनात केली आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पांडव, सुयश पाटील आदी पोलीस कर्मचारी महामार्गावरून गस्त घालीत आहेत.