सोमवारी चिपळुनात मराठा समाजातर्फे निषेध मोर्चा
चिपळूण/ओंकार रेळेकर:- जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधव-भगिनींवर झालेल्या अमानुष लाठी हल्लाप्रकरणी चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवार दिनांक ४ रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजातर्फे गेल्या काही वर्षांपासून लढा दिला जात आहे. यामध्ये राज्यभर मूक मोर्चा देखील काढण्यात आला होता. तर आता गेल्या काही दिवसांपासून जालना येथे मराठा समाज बांधव भगिनींचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी पोलीस दलाकडून उपोषणकर्त्यांवर अमानुष हल्ला झाला. या घटनेचे जालनामध्ये तीव्र पडसाद उमटले. यानंतर राज्यभर देखील याच्या प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जालना येथील मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तर हा अमानुष लाठी हल्ला प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मोर्चाची सुरुवात चिपळूण नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून होईल. नंतर चिंचनाकामार्गे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तिथून प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.या मोर्चासाठी मराठा समाजातील सर्व समाज बांधवांनी काळ्याफिती व काळे वेश परिधान करून यावे, असे, यावेळी सांगण्यात आले.हा मोर्चा शांततेत काढण्यात येणार आहे व सर्वांनी सहकार्य करावे. तसेच जास्तीत जास्त मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला उद्योजक प्रकाश देशमुख, दिलीप देसाई, अजित साळवी, सतीश कदम, सुनील सावंतदेसाई, राकेश शिंदे, संतोष सावंतदेसाई, दीपक शिंदे, प्रभाकर मोरे, सुबोध सावंतदेसाई, सचिन नलावडे, सतीश शिंदे, निलेश चव्हाण, के. डी. कदम, निर्मला जाधव, नीलिमा जगताप, अंजली कदम, मालती पवार, सीमा चाळके, रश्मी मोरे आदी उपस्थित होते.