नवी दिल्ली:- भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी महिलेची वर्णी लागली आहे. जया वर्मा-सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे.
शुक्रवारी त्यांनी या पदाचा कारभार स्वीकारला.
जया वर्मा-सिन्हा यांनी अनिल कुमार लाहोटी यांची जागा घेतली आहे. लाहोटी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या जागी चार सदस्यी समितीने जया वर्मा-सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. 31 ऑगस्ट 2024पर्यंत त्या या पदावर असतील.
जया वर्मा-सिन्हा या रेल्वे बोर्डात ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलोपमेंट विभागात सदस्या होत्या. याआधी त्या रेल्वेच्या वाहतूक परिवहन विभागात अतिरिक्त सदस्य होत्या. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. सिग्नल यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला होता आणि याची सोप्या शब्दात माहिती जया वर्मा-सिन्हा यांनी माध्यमांना दिली होती. तसेच पीएमओमध्येही त्यांनी यासंदर्भात प्रेझेंटेशन दिले होते.
जया वर्मा-सिन्हा यांनी अलाहाबाद विद्यापिठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. 1988 मध्ये त्या भारतील रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. रेल्वे बोर्डात सदस्य, ऑपरेशन्स आणि बिजनेस डेव्हलपमेंट पदावर कार्यरत होत्या. याशिवाय जया वर्मा यांनी दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक, पूर्व रेल्वे आणि उत्तर रेल्वेमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणूनही काम केले आहे.
ढाका येथील उच्चायुक्तालयात 4 वर्षे सल्लागार म्हणून नियुक्त होत्या. कोलकाता ते ढाका धावणारी मैत्री एक्स्प्रेस त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाली होती.