इंटरपोलला माहिती देणार
रत्नागिरी:- दापोली आणि गुहागर समुद्रकिनारी सापडलेल्या चरसच्या गोणींवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे नाव आढळून आले आहे. ही आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी असून या प्रकरणात इंटरपोलचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
दापोली समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी चरसच्या गोणी सापडल्या होत्या. त्यानंतर पोलीसांनी किनारपट्टीवर शोधमोहिम राबवली. सुमारे अडीचशे किलो चरस पोलीसांना सापडले. त्या चरसची किंमत दहा कोटींच्यावर आहे. पोलीसांनी गुजरात एटीएसशी संपर्क साधला असता गुजरातमध्येही अशाप्रकारच्या चरसच्या गोणी सापडल्याची माहिती पुढे आली. हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचा प्रकार असल्यामुळे त्याचा तपास एनआयएमार्फत व्हावा या दृष्टीने पोलीसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दापोली किनाऱ्यावर सापडलेल्या गोणीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे लिहीलेले आढळले आहे. यामुळे ही आंतरराष्ट्रीय तस्करी असून याची माहिती इंटरपोललाही कळवण्यात येणार आहे.