राजापूर:-गेल्या तीन-चार महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या आणि जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने तालुक्यामध्ये पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
अनेक गावांमधील जनावरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सहा जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत, तर लम्पी आजार झालेली १६ जनावरे उपचाराअंती बरी झाली असली तरी अद्यापही ४१ जनावरे लम्पी आजाराने आजारी आहेत.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये जनावरांना होणार्या लम्पी आजाराचा संसर्ग वाढू लागला होता. या काळामध्ये तालुक्यातील दीडशेहून अधिक गुरांना लम्पी आजाराचा संसर्ग झाला होता. लम्पी आजाराला प्रतिबंध करणारी लसही टोचण्यात आली. तालुक्यामध्ये लम्पी आजार काहीसा आटोक्यात आला होता. विविध भागातील गावांमधील ६७ जनावरांना गेल्या काही दिवसांमध्ये लम्पी आजार झाला आहे. लम्पी आजाराच्या अनुषंगाने जनावरांना लसीकरण करण्यासह अन्य विविध उपाययोजना, उपचार करण्यावर पशुवैद्यकीय विभागाने भर दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांनीही लम्पी आजाराचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जनावर मालकांना भरपाई
लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाईपोटी साहाय्य म्हणून अनुदान दिले जात आहे. त्यामध्ये गायीला ३० हजार, बैलाला २५ हजार आणि लहान वासराला १६ हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. लम्पी आजाराचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या २० जनावरांच्या मालकांना अनुदान प्राप्तीसंबंधित शासनाकडे पशूविभागाकडून प्रस्ताव सादर केले जातात. त्यामुळे शासनाकडून मिळणार्या अनुदानामुळे लम्पी आजाराने होणार्या नुकसानीपासून शेतकर्यांना दिलासा मिळत आहे.