दापोली:-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या रोजंदारी मजुरांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ही वाढ सप्टेंबरपासून देण्यात येणार आहे.
कोकण कृषी विद्यापिठात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दररोज ३०० रुपये मजुरी दिली जात होती. त्यात १०९ रुपयांनी वाढ करण्याचा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार सप्टेंबरपासून मजुरांना एकूण ४०९ रुपयांची मजुरी देण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र लवकरच जारी करण्यात येईल, असे विद्यापिठाच्या सुत्रांनी सांगितले. कामगार भरतीही कोणत्याही इतर कंपनीकडून न घेता विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात यावी, अशी मागणी कार्यकारी परिषद सदस्य आमदार योगेश कदम यांनी केली आहे. त्यालाही यश आले आहे.
आमदार कदम व अन्य सदस्यांच्या सततच्या प्रयत्नातून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या रोजंदारीत वाढ झाली आहे. आता यापुढील लढाई कामगारांना सेवेत सामावून घेण्याची गरज आहे. रोजंदारी कर्मचारी सरळ सेवेत सामावून घेतले जातील असा विश्वास आहे, असे मत श्रमिक कामगार संघटना कृषी विद्यापीठ दापोलीचे अध्यक्ष संतोष भुवड यांनी व्यक्त केले. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना रोजंदारी कामगार म्हणून न मानता ठेका पद्धतीने काम करावे, याबाबत विद्यापीठ प्रशासन आग्रही होते; मात्र, यामुळे आपली सेवाज्येष्ठता डावलली जाईल, अशी भिती कर्मचाऱ्यांना होती. तसेच कामगारांना कायम करण्याबाबतचा विषय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे अस्थायी कर्मचाऱ्यांनी विद्यापिठाला प्रतिज्ञापत्र करून द्यावे, अशी अट विद्यापिठाने घातली होती; मात्र काही कामगारांनी विद्यापिठाची ही अट फेटाळून लावली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही प्रतिज्ञापत्राची अट मागे घेतली आहे.