स्टार कॅम्पस अवॉर्ड मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय
रत्नागिरी– अर्थ डे नेटवर्क इंडिया या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘२०२३ स्टार कॅम्पस अवॉर्ड’ रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला नुकताच प्रदान करण्यात आला आहे. हा अवाँर्ड मिळविणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
अर्थ डे ऑर्गनायझेशन ही विश्वव्यापी संस्था पर्यावरण संवर्धन क्षेत्रात १९७० पासून कार्यरत असून, जगभरात १९० पेक्षा जास्त देशांमधील पन्नास हजारपेक्षा अधिकसंस्थांसोबत कामकरीत आहे. शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती आणि साक्षरता समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलेआणि महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना देशपातळीवर प्रसिद्धी देण्यात येते. यासंस्थेमार्फत महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संकुले शाश्वत, पर्यावरणपूरक आणि हरित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी STAR CAMPUS AWARDS अर्थात तारांकित परिसर पारितोषिक ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालयाने समाजामध्ये राबविलेले पर्यावरणपूरक कार्यक्रमांची जसे ऊर्जाबचत, पाण्याचे योग्य नियोजन – पावसाळी पाणी साठवण, रासायनिक आणि जीवशास्त्रीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी जपत दत्तक गावांमध्ये पर्यावरण पूरक राबविण्यात आलेल्या उपक्रमांची नोंद अर्थ डे संस्थेकडून घेतली गेली.
पर्यावरणीय संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महाविद्यालयाने इतर शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थ डे संस्थेचे विनायक साळुंखे यांनी केले. मनोगतातून त्यांनी अर्थ डे संस्था, तिचे पर्यावरण क्षेत्रातील कार्य, हे पारितोषिक देण्यामागील उद्देश आणि संकल्पना याविषयी उपस्थितांना माहिती दिली. ऊर्जा बचत, पाण्याचे योग्य नियोजन, कचऱ्याची विल्हेवाट, परिसरातील हिरवळ आणि सामाजिक बांधिलकी या पाच श्रेणींसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत विकासासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगून महाविद्यालयाने केलेल्या कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाला हे पारितोषिक देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.