दापोली:- सण आयलाय गो आयलाय गो…., नारली पुनव चा…, मनी आनंद मावणा…, कोळयांचे दुनियेचा…., अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ….,देवाचे पुंजेला…, हाथ जोरूंशी नारल सोन्याचा देऊया दरीयाला अशा एकापेक्षा एक पारंपारीक कोळी गीतांच्या ठेक्याच्या तालावर थिरकत पाजपंढरीतील मच्छिमार कोळी समाज बंधु भगिनींनी एका होडीत ठेवून सजविलेल्या सोन्याच्या नारळाची श्रीराम मंदिरापासून वाजत गाजत मिरवणुक काढत समुद्राला शांत होण्यासाठी बुधवारी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण केला.
रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यात असलेले पाजपंढरी हे गाव संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले मच्छिमार कोळी समाज लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाच्या आशिर्वादाने या गावाच्या ऐकीचे ऐक्य अभाधित असेच आहे. अशा या पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमेच्या दिवशी रुमाल कमरेला बांधून हाती वल्हा घेतलेली पुरुष मंडळी तर नऊवारी साड्याा नेसून डोक्यावर मंगल कळश घेतलेल्या कोळी भगिनी समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी आपल्या पारंपारिक कोळी वेशभुषेत आणि कोळी गीतांच्या ठेक्यावर नाचत जावून कोळी बांधवांनी दर्या राजाला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला. हे दृष्य म्हणजे कोळी संस्कृतीच्या वारषाचा साज आणि परंपरा जपणारे असे होते.
दरवर्षी मासेमारीला समुद्रात जाण्याआधी खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी मच्छिमार कोळी समाज बंधु भगीनींकडून सागराची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. ही अनेक वर्षांपासूनची पाजपंढरी गावाची थोर परंपरा आहे. काळ बदलला तरी कोळी बांधवांच्या या परंपरेत आज तसुभरही बदल झालेला नाही. संपूर्ण पाजपंढरी गावातून कोळी मच्छिमार बंधु भगिनी समाज बांधव हे आपला पारंपारीक कोळयांचा वेश परिधान करून मिरवणुक काढतात. त्यामध्ये लहान थोर महिला पुरूष सहभागी होत पारंपारीक कोळीगीते आणि वाद्याच्या तालाच्या ठेक्यावर या मिरवणुका निघतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्राला विधिवत अर्पण केला जातो.
पाजपंढरी या गावात एकुण दहा मंडळे आहेत दरवर्षी यजमान पार्टीला गावात वर्षभर होणारे सण उत्सव साजरे करण्याचा गावाकडूनच मान दिला जातो तसा येथील गावाचा प्रघात आहे त्यानुसार यावर्षी यजमान शेतवाडी मंडळ ही यजमान पार्टी आहे. त्यामुळे यावर्षीचा मान शेतवाडीला मिळाला. त्यामुळे पाजपंढरी या गावातर्फे यजमान शेतवाडी मंडळाने समुद्राला नारळ अर्पण केला. तर अन्य असलेल्या गोरेवाले, तुरेवाले मंडळ, रस्ताले मंडळ, होमावाले मंडळ, जूनी कुलापकर मंडळ, नवीन कुलापकर मंडळ, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ या अशा पाजपंढरी गावातील मंडळांनी आप आपल्या मंडळाचे नारळ समुद्राला अर्पण केले. कोळी संस्कृतिचे दर्शन काय असते ते पाजपंढरीत आज पाहायला मिळाले.