शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन दुजाभाव करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
दापोली:- तालूक्यातील आतगाव हद्दीत अन्न पुरवठा विभागाचे तब्बल 51 वर्ष वापराविना पडून असलेले गोदाम शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरण्यास मिळावे, यासाठीची केळशी परिसर आंबा उत्पादक संघाने केलेली मागणी शासनाच्या लाल फितीत अडकून पडली आहे.त्यामुळे हेच का ते शासनाचे शेतकऱ्यांच्या हिताचे शासन निर्णय, असा संतप्त सवाल केळशी परिसरातील शेतकरी करत आहेत.
आपला कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांच्या विविध कृषी विषयक गरजा भागविण्यासाठी सहकारी संस्था काम करतात. अशाच प्रकारची दापोली तालूक्यात केळशी येथे केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ मर्यादित केळशी या नावाने केळशी परिसरातील शेतकऱ्यांसाठी काम करतो. अशा या संघाने आपल्या कार्यक्षेत्रातील आणि केळशी या गावाला लागूनच असलेल्या आंतगाव येथे गेले कित्येक वर्ष पडीक असलेला सरकारी गोदाम नाममात्र भाडयाने मागितला. मात्र शासन ते देण्यास टाळाटाळ करत आहे. मग हेच का ते शेतकऱ्यांसाठी शासन घेत असलेले हिताचे निर्णय, असे शेतकरी विचारत आहेत.
केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघ 1994 पासून कृषी विकासाच्या व शेतकरी हिताच्या योजना शासनाच्या सहकार्याने राबवित आले आहे. 2000 सालापासून एमएसपी दराने धान खरेदी केंद्र मार्केटींग फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून चालवतो. मागील वर्षी येथील भात खरेदी केंद्रावर 1810 क्विंटल धान खरेदी करण्यात आले व त्यायोगे परिसरातील शेतकऱ्यांना सुमारे 50 लाख रूपये मिळाले. 3 जून 2020 ला धडकलेल्या निसर्ग चक्री वादळात येथील शेतकऱ्यांच्या फळबागा पार उध्वस्त झाल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा आता भात हेच एकमेव चरितार्थ साधन उरले आहे.
आतगाव येथील गोदाम हे 1965 मध्ये बांधण्यात आले होते. मात्र, 1972 पासून ते वापराविना पडूनच आहे. असे हे पडीक गोदाम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून दोन वर्ष वापरण्यास मिळाले. दरम्यान पडीक असलेल्या या गोदामाच्या दुरूस्तीसाठी आंबा उत्पादक संघाने 4 लाख रूपये दुरूस्तीसाठी खर्चही केले आणि पडीक गोदाम वापरात आणले. त्यानंतर मात्र शासनाने वक्रदृष्टी दाखवत गोदाम देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनी यांना निवेदने आणि भेटीगांठीव्दारे वस्तुस्थिती आणि परिस्थिती सांगण्यात आली. मात्र सुस्त प्रशासनाने निवेदने बासनात गुंडाळून ठेवली. तर लोकप्रतिनिधीची आश्वासने फोल ठरली. गोदाम मिळाले काय आणि नाही मिळाले काय संघाचे नुकसान नाही. मात्र ज्या प्रामाणिक उद्देशाने संघ शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविला जात आहे. त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे खरेच शासनाची शेतकऱ्यांना मदत करण्याची दायित्वाची भुमिका असेल तर शासनाने केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संघाला 99 वर्षाच्या भाडेत्त्वाच्या नाममात्र भाडे करारावर हे गोदाम भाडयाने देवून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केळशी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.