श्री राधाकृष्ण मंदिर, वरवडेच्या प्रतिकृतीची आरास पाहण्यासाठी भाविकांचा गर्दीचा उच्चांक
जिल्हाभरातील अनेक भजन मंडळांची भजनसेवा
रत्नागिरी:-प्रतिवर्षी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार ते दुसरा सोमवार या सप्ताहात श्री भैरीदेव देवस्थान जांभारीच्या मंदिरात पारंपारिक रिवाजानुसार अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. श्री भैरीदेवावर नितांत श्रद्धा असणारे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील भाविकांसह इतर जिल्ह्यांतील तसेच मुंबई-पुणे स्थित गावकरी भक्तीभावाने या नाम सप्ताहाला सहकुटुंब – सहपरिवार हजेरी लावतात.
यावर्षी सोमवार दिनांक २१ऑगस्ट रोजी नामसप्ताहाला सुरूवात झाली. यावर्षीचे नामसप्ताहाचे आकर्षण म्हणजे श्री. राधाकृष्ण मंदिर, वरवडे यांची हुबेहूब प्रतिकृतीची आरास श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ, कटनाक वटार, जांभारी यांनी साकारली होती. श्री भैरीदेवाच्या चरणी लीन होण्यासाठी व श्री राधाकृष्ण मंदिर वरवडे या मंदिराची प्रतिकृती पहाण्यासाठी यावर्षी अलोट गर्दी दर दिवशी श्री भैरी मंदिरात झाली.
आजपर्यच्या उत्सवातील भक्तमंडळींची उच्चांकी उपस्थिती यानिमित्ताने जांभारी गावात अनुभवास आली. या वर्षी नामसप्ताहाच्या निमित्ताने श्री भैरी मंदिरात सत्कोंडी महिला भजन मंडळ, वाटद भजन मंडळ, चवे देऊड भजन मंडळ, जाकादेवी भजन मंडळ, कासारी भजन मंडळ, तरीबंदर कुडली भजन मंडळ, महिला भजन मंडळ ओणीभाटी, दाभोळ, राधाकृष्ण भजन मंडळ वरवडे, सोमजाई भजन मंडळ वरवडे, माऊली भजन मंडळ, बनवाडी, सैतवडे, महालक्ष्मी भजन मंडळ कारवांची वाडी रत्नागिरी, चाफेरी पाटील वाडी भजन मंडळ आणि कुणबीवाडी नांदिवडे भजन मंडळ यांनी श्री भैरीदेव मंदिरात आपली भजन सेवा करुन मंदिर हरिनामाने दुमदुमून सोडले. जांभारी ग्रामस्थ बंधू-भगिनींनी नित्यनेमाने या नामसप्ताहात आनंदाने सहभागी होऊन अखंड भजन रूपाने श्री भैरी चरणी आपली सेवा अर्पण केली.
नामसप्ताह समाप्तीला श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ कटनाक वटार, जांभारी यांनी सर्व भाविकांना प्रसाद वाटप केले. संपूर्ण नामसप्ताहाच्या कालावधीमध्ये ज्या सर्व ज्ञात-अज्ञात भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पाडण्यासाठी सहकार्य केले अशा सर्वांचे श्री भैरीदेव देवस्थान, जांभारी आणि श्री गजानन प्रासादिक विकास मंडळ कटनाक वाडी, जांभारी यांच्या वतीनेआभार मानण्यात येत आहेत.