कडवई:-संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचा सुपुत्र तईब अझीम जुवळे याची अठरा वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे. तैवान येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कडवई येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू (कै.) अझीम मन्सूर जुवळे यांचा सुपुत्र तईब हा सध्या मुंबई येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असून, त्याची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे.
त्याला लहानपणापासूनच फुटबॉल या खेळाची आवड होती. त्याने शिक्षण घेत असतानाच फुटबॉल खेळामध्ये विविध स्पर्धामधून प्रावीण्य मिळवले. याची दखल घेत भारतीय फुटबॉल असोसिएशनच्यावतीने त्याची नुकतीच १८ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड करण्यात आली. अठरा वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे. तैवान येथे सुरू असलेल्या आशिया चषक क्रीडास्पर्धेसाठी तो तैवानला रवाना झाला आहे. त्याच्या या यशामुळे कडवई गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.