कलासाधनेचा अविष्कार सादर करणारा कलावंत
संगमेश्वर/दिनेश आंब्रे:-संगमेश्वरातील तालुक्यातील नावडी गणेश आळी येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच वैविध्यपूर्ण कलावंत गजानन अनंत लाड यांच्या गायन वादन कलेला ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गजानन लाड यांचा संगीताचा प्रवास पैसाफंड हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना विविध शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन तबला वादन, गायन आणि हार्मोनियम इत्यादी कलांची आवड निर्माण झाली.
पुढच्या प्रवासात जाऊन त्यांनी स्वतःचा गिरण व्यवसाय सांभाळून आपल्या कलेची आवड जोपासली. त्यामध्ये त्यांना कै. पाडुरंग गणपतशेठ वारंगे आणि कै. बाबिरराव सरमुकादम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षापासून बाहर गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरवात केली.मलकापूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये गोकुळष्ठमीला त्यांनी तब्बल ११ वर्ष सलग वार्षिक गायनाचा कार्यक्रम केला. तसेच पुढे त्यांनी कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यात जाऊन गायनाचे कार्यक्रम केले. यामध्ये त्यांना तबला वादक म्हणून पुढील कलाकारांची साथ लाभली.कैलास शेट्ये,कृष्णा लिंगायत आणि कै. महेश भागवत
लाड यांना तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवर कार्यक्रम करत असताना २००२ मध्ये नेहरू युवा केंद्र (रत्नागिरी) यांसकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तालुका स्तरीय विश्व समता कलामंच लोवले यांसकडून विश्व समता प्रज्ञा गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गायन, तबला आणि हार्मोनियम या कलांचा त्रिवेणी संगम गजानन लाड यांच्यामध्ये दिसून येतो तसेच त्यांच्या जीवनाची ही तपस्या अमृतमोहत्सवी पूर्णत्वाकडे जात आहे.