पालकमंत्री ना.उदय सामंत यांना शेतकऱ्यांचे निवेदन
चिपळूण:- कापरे साठवण तलाव भूसंपादन बाधित शेतकरी मोबदला मिळणेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी शनिवारी पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेत निवेदन सादर केले.
यानंतर पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दोन दिवसांत तलावासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
कापरे (भेलवने) येथे डिसेंबर सन २०१९ पासून तलावाचे काम सुरू आहे. सदरच्या कामाची कायदेशीर नोटीस भूसंपादन बाधित शेतकऱ्यांना सन २०२१ रोजी मिळाली. दीड वर्षापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी यांनी कापरे ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये पुढील 11 (ब) नोटीस आम्ही ४५ दिवसामध्ये जाहीर करणार असल्यो सांगीतले. मात्र, आजतागायत ही नोटीस जाहिर झालेली नाही. सदरील नोटीस जाहीर होण्यास दिरंगाई झाल्यामुळे पुढील कामकाजाच्या संदर्भातील नोटीस जाहीर होत नाही. त्यामुळे भूसंपादनबाधित शेतकरी मोबदल्यापासून मागील चार वर्ष वंचित राहिलेले आहेत. हे सर्व भूसंपादनबाधित शेतकरी यांच्या बहुतांश जागा या साठवण तलाव प्रकल्प बाधित झालेल्या आहेत. हे शेतकरी आंबा, काजू बागायतदार व भातशेती धारक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह या जागेतून मिळणाया उत्पन्नावर आधारित आहे. तरी याबाबत शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी करत निवेदन सादर केले.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत याबाबती माहिती घेतली आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगीतले.
यावेळी दत्ताराम मोरे, सुरेश मोरे, अवधूत मोरे, आरती भुर्के, विनायक मोरे ,सदा मोरे, प्रकाश कदम ,संजय कदम आणि आशिष मोरे उपस्थित होते.