देवरुख:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ग्रामीण रुग्णालय, देवरुख आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी संयुक्तपणे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य व मानसिक तपासणी केली.
आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्रचार्य डॉ. सरदार पाटील यांनी वैद्यकीय पथकाला पुष्पगुच्छ देऊन केली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने गेली चार वर्ष विद्यार्थ्यांसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचे उत्तम आयोजन केले जात असल्याचे याप्रसंगी नमूद केले. या शिबिराशिवाय ग्रामीण रुग्णालयाची डॉक्टरांकडून इतर वेळीही उत्तम वैद्यकीय सेवा व सहकार्य विद्यार्थ्यांना मिळत असल्याबाबतची माहिती यावेळी दिली.
आरोग्य तपासणी पथकामध्ये डॉ. गौरव धामणे, डॉ. पूनम पावरी, परिचारिका सौ. कल्याणी टाकळे यांचा समावेश होता. या पथकाने विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयुक्त व्यायाम, सकस आहार, वैयक्तिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय त्वचा, केस, डोळे, पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार या संदर्भातील विकारांबाबत माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ७२० विद्यार्थ्यांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली.