चिपळूण: किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते उभे राहणार असतील तर आम्ही त्यांना साडेतीन लाखांच्या अधिक; मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी तसा निर्णय घेतल्यास शिवसेना त्यांना विजयी करेल. आगामी निवडणुका संदर्भात बोलताना ना. सामंत म्हणाले, आत्ताच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सामील झाला आहे. फक्त काँग्रेस बाहेर आहे. आम्ही, भाजप, आर पी आय आणि राष्ट्रवादी गट एकत्रित जो निर्णय घेऊ तो सर्वांना मान्य असेल. एकत्रित बसूनच उमेदवार ठरवले जातील. मात्र जर आपले बंधू किरण सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर आपण त्यांना निवडून आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आणि साडेतीन लाखांनी विजयी करू असा विश्वास सामंत यांनी चिपळूण येथे व्यक्त केला.