चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अमित ठाकरे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली महामार्गावर २७ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पनवेल ते सावंतवाडी दरम्यान पदयात्रा काढली जाणार आहे. सकाळी ७ वाजता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी तेथील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढली जाणार आहे. चिपळुणात परशुराम घाटातील ओमेगा हॉटेलपासून पाग नाका अशी पदयात्रा काढली जाणार आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे डोकेदुखी ठरत आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अनेकवेळा महामार्गाच्या
कामाची पाहाणी करून वेळोवेळी एक लेन सुरु होण्याची डेडलाईन देखिल दिली. मात्र अद्याप जैसे थे परिस्थिती दिसून येत असून कोकण वासियांकडून राज्य शासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत रोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार महामार्गावर विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. गणेशोत्सव तोंडावर आला असून अद्याप महामार्गाच्या कामात म्हणावी तशी प्रगती दिसून येत नाही. त्यामुळे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्यावतीने पुन्हा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढली जाणार आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे, वसंत तात्या मोरे, वैभव खेडेकर; जावेद शेख, देवराज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळुणात परशुराम घाटातील ओमेगा हॉटेलपासून पाग नाका
अशी पदयात्रा काढली जाणार असून खेड, दापोली, मंडणगड, गुहागरसह चिपळूण तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सचिव संतोष नलावडे यांनी केले आहे.