रत्नागिरी:-येणारे दिवस सणासुदीचे आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता सर्वच विभागांनी घ्यावी. रेल्वे स्टेशनपासून शहरात येण्यासाठी रिक्षा भाड्याची योग्य आकारणी होते का, वजनेमापे तसेच मिठाई, खाद्यपदार्थ याबाबत संबंधित विभागांनी अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी स्वागत प्रास्ताविक केले. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सूचना दिल्या. ते म्हणाले, रिक्षा भाडयाची योग्य आकारणी होते की नाही, हे उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासावे.
त्याचबरोबर अशा सूचनाही सर्व तालुक्यांना द्याव्यात. अन्न व औषध विभागाने येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची तपासणी करावी. विशेषत: मिठाई, खवा अशा पदार्थांची तपासणी आणि एक्सपायरी डेट याबाबत विशेष दक्षता घ्यावी. मिठाई वजन करताना बॉक्ससह होणार नाही, याबाबतही जनजागृती करुन तपासणी करावी.
महावितरणने नादुरुस्त वीज मीटर बदलून द्यावेत. सरासरी बील पाठविताना योग्य मध्यम बीलाची आकारणी व्हावी.
प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. या ग्राहकाची फसवणूक होणार नाही, याची जबाबदारी ग्राहकांसह सर्वच विभागांची आहे. त्याबाबत दक्ष आणि जागृत राहून कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.
सोळा चायनिज सेंटर मधील खाद्यपदार्थांचे नमूने घेण्यात आल्याची माहिती यावेळी अन्न व औषध विभागाकडून देण्यात आली.
‘तो’ तांदूळ प्लास्टीकचा नसून ‘फोर्टीफाईड’
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी रेशन दुकानामधून वितरीत करण्यात येणाऱ्या तांदळाबाबत माहिती दिली. रेशनवरुन देण्यात येणारा तांदुळ हा प्लास्टीकचा नसुन तो फोर्टीफाईड तांदुळ असल्याचे सांगितले. हा तांदूळ पाण्यावर तरंगतो. इतर तांदळापेक्षा वेगळा दिसतो. मात्र, तो पोषक तत्वांची कमतरता दूर करणारा आहे. हा तांदूळ शिजायला वेळ लागत नाही. चवीलाही नेहमीच्या तांदळासारखा आहे. १०० किलो मध्ये १ किलो फोर्टीफाईड तांदळाचे प्रमाण असते. याबाबत जनजागृती व्हावी, असेही त्या म्हणाल्या.
या बैठकीला पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, बीएसएनएलचे सहा. महाप्रबंधक एस.एस. कांबळे, उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र द.भि. गोरे, मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, अशासकीय सदस्य रमजान गोलदांज, शकील मजगावंकर, सुहेल मुकादम, संजय बामणे, पद्माकर भागवत, सुनिल रेडीज, डॉ. विकास मिर्लेकर, चंद्रकांत खोपडकर, अल्लाउद्दीन ममतुले, अनंत रहाटे, मनिषा रहाटे, सुशांत जाधव, डॉ. मिताली मोडक आदी उपस्थित होते.