मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ४ डिसेंबर रोजी कोकण (महाराष्ट्र) दौऱ्यावर येणार आहेत. नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौसेनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यापूर्वी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात त्यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, ४ डिसेंबर रोजी नौसेना दिवस असून हा दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्याचा निर्णय भारतीय नौदल आणि राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. नौसेना आणि राज्य सरकारच्या वतीने किल्ल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठकही पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक संबोधले जाते. त्यामुळे यावर्षीचा नौसेना दिन ३५० वर्ष जुन्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.