चिपळूण:- येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला विनायक निजसुरे, गणेश नेने, प्रशांत ठोसर, शैलेश मुळे, संदीप निजसुरे, गौरव लवेकर या नामवंत नाणी संग्राहकांनी भेट दिली.
त्यांनी संग्रहालयासाठी दोन हजार वर्षपूर्वीपासून ते सोळाव्या शतकापर्यंतची नाणी भेट दिली. यात मौर्यकाल, सातवाहन, कुशन, विश्नुकुंडी, वाकाटक, मुरूड-जंजिरा संस्थान अशा विविध कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर वाचनालयाने, इतिहासात कोकणावर जेवढ्या राजवटी झाल्या त्या सर्वांची नाणी या असावीत यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. नाणी संग्राहकांनी वाचनालयाच्या संग्रहालयातील वस्तू तसेच नाणी पाहून समाधान व्यक्त केले. संस्थेने साकारलेल्या कलादालनातील तैलचित्रांची माहिती घेऊन यापुढे आम्ही ग्रंथालयाच्या संग्रहालयाला सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे नाणी संग्रहकांनी सांगितले. कोकणात इतके भरीव कार्य करणारी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्था अभिमानास्पद असल्याचेही संग्राहकांनी सांगितले.
ग्रंथालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी सर्वांना चिपळूण १९४२ हे पुस्तक भेट दिले. संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच संग्रहालय पुन्हा सुरू होणार असल्याचे ओक यांनी यावेळी सांगितले.