देवरुख:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक स्थळावरील परमवीर चक्र दालनामध्ये भारतीय अंदमान निकोबारमधील बेटांना सर्वोच्च पराक्रम गाजवणाऱ्या परमवीचक्र विजेत्यांच्या नावाच्या नकाशाचे औपचारिक अनावरण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या शुभहस्ते करण्यातआले. या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारक स्थळी अभिवादन केले. महाविद्यालयाच्या आर्मी व नेव्ही कॅडेट्सनी अनुक्रमे प्रा. सानिका भालेकर आणि प्रा. उदय भाटे यांच्या नेतृत्वाखाली सलामी दिली. यावेळी शशिकांत गानू, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, विविध शैक्षणिक आस्थापनांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व देशप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिलेला नकाशा बसवण्याचा उद्देश स्पष्ट करतानाच, शहीद स्मारक स्थळावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल या तीनही शैक्षणिक आस्थापनांमध्ये दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीनही दिवशी ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बहुसंख्य उपस्थित उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने प्रा. अरविंद कुलकर्णी यांचे विभाजन विभीषीका स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने श्री. विवस्वान हेबाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.