सिंधुदुर्ग:- तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक 2021 मध्ये आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा सर्पमित्र महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक (Castro coral snake) आढळून आला आहे.
रविवारी (दि.13) संध्याकाळी तुळस चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना फोन करून एक छोटासा साप असल्याची माहिती दिली. राऊळ यांनी सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले.
हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ (Castro coral snake) असा आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात. हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. छायाचित्रकारांना सुद्धा या सापाचे फोटो काढणे म्हणजे एक पर्वणीच असते. सिंधुदुर्गमध्ये या सापाची नोंद तिसऱ्या वेळी झाली आहे. त्यामध्ये वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांना हा साप मृत अवस्थेत आढळला होता. आणि त्यानंतर सात ते आठ वर्षांनी दोन वेळा जिवंत साप महेश राऊळ यांना आढळून आला आहे. या सापाचे संशोधन हेमंत ओगले यांनी केले आहे. हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस पडत नाही.
या सापाचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून पूर्णपणे भगवा असतो. आणि त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो. त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते. हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्याजवळ येऊ नका, असा इशारा देत असतो.
याआधीही बरेचसे अति दुर्मिळ असे पशु, पक्षी, प्राणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेले आहेत. हल्लीच तुळस गावाच्या बाजूला होडावडे गावात रात्री चमकणारी अळंबी आढळून आली होती. याआधी काळा वाघ असेल, रांगणा गडावर आढळलेला शेवाळी साप किंवा इतर दुर्मिळ पक्षी सिंधुदुर्गातच आढळल्याची नोंद आहे. या रेस्क्यूच्या वेळी त्यांच्यासोबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर आणि सद्गुरु सावंत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.