रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत असे मत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी व्यक्त केले आहे.
कोकणातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण होणार असल्याचा मोठा गाजावाजा सत्ताधारी लोकांकडून केला जात आहे.यावर भाष्य करताना उदय गोताड यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या नेमक्या अडचणी काय आहेत याकडे लक्ष वेधले. कोकणातील जनतेला आकर्षक रेल्वे स्टेशन पेक्षा त्या स्टेशनवर नियमित थांबणाऱ्या रेल्वे गाड्या हव्या आहेत.
कोकण रेल्वे आली मात्र त्या रेल्वेत कोकण नेमके कुठे आहे?असा सवालच उदय गोताड यांनी केला आहे.वाढीव रेल्वे गाड्यांसाठी कोकणातील जनतेला नेहमी संघर्ष करावा लागतो. वारंवार मागण्या करूनही कोकणासाठी पुरेशा रेल्वे गाड्या उपलब्ध होत नाहीत.याकडे उदय गोताड यांनी लक्ष वेधले आहे.केंद्र सरकारने कोकणातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवावी व कोकणातील सर्व महत्त्वाच्या स्टेशनवर गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी यानिमित्ताने उदय गोताड यांनी केली आहे.