देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात महसूल सप्ताहा निमित्त युवा संसद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय, देवरुख व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, नायब तहसीलदार श्री. पंडित, प्रतीक आढाव, सुधीर यादव, द्वारकेश तायडे, अतुल बेंडखळे, विकास चव्हाण आणि पाटील मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचाली दरम्यान उपयुक्त दाखल्यांचे महत्त्व लक्षात आणून, या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नायब तहसीलदार पंडित यांनी विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला, अधिवास व जातीचा दाखला इत्यादी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी योग्य कागदपत्रांची जोडणी करणे, त्याचबरोबर वेळेवर दाखले मिळवण्यासाठी आपला व शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी योग्य कागदपत्रांची जोडणी करणे आवश्यक असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
सुधीर यादव यांनी पिक योजना व गावठाण जमिनी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले होते.