खेड:- शहरात विविध भागात डेंग्यूचे २२ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कता बाळगली आहे.खेडमध्ये डेंग्यू साथीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी खेड नगर प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र दिवसागणिक डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असून आतापर्यंत शहरातील विविध भागात डेंग्यूचे २२ रुग्ण आढळले आहेत.
पूरस्थिती ओसरल्यानंतर नगर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहाम हाती घेत परिसर चकाचक केला होता. याशिवाय पूरग्रस्त भागात जंतुनाशक फवारणीही केली होती. तरीही पूरस्थितीनंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने ३० कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. पुन्हा एकदा नगर प्रशासनाने जंतुनाशक फवारणीची मोहीम सुरू केली आहे.