नेहमीप्रमाणे कोकणवासीयांची थट्टा
रायगड:-मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तडाखे दिल्यानंतर जागे झालेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीचा केवळ फार्स उरकत आहेत.
आज पुन्हा या महामार्गाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चव्हाण यांनी 20 दिवसांपूर्वीच्याच घोषणांची टेप पुन्हा वाजवली. गणपतीपर्यंत एक लेन सुरू करू, डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरू करू असे जुनेच पालुपद त्यांनी लावले. त्यामुळे यंदाच्या गणपतीतही चाकरमान्यांना गचके खातच गावाला जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खड्ड्यांचा महामार्ग अशी ख्याती असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची साफ चाळण झाली आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2010 मध्ये सुरू झाले, परंतु बारा वर्षे उलटून गेल्यानंतरही हे काम अद्यापि लटकलेलेच आहे. त्यातच या महामार्गावर प्रत्येक दोन फुटांवर महाकाय खड्डे पडले आहेत. गेल्या बारा वर्षांपासून या मार्गावर चाकरमानी आणि प्रवाशांचा कंबरतोड प्रवास सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या रस्त्याच्या दुरवस्थेवरून राज्य सरकारला चांगलेच फटकारले. चाकरमान्यांनीही आमचा गणपतीचा प्रवास सुखाचा होऊ द्या असे सुनावले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना जाग आली आणि १४ जुलै रोजी त्यांनी पनवेल ते इंदापूर मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गणपतीपूर्वी या महामार्गाची एक लाईन व डिसेंबरपर्यंत दुसरी लाईन सुरू करू असे आश्वासन दिले.
चव्हाण यांच्या या घोषणांच्या बातम्याही सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. आज पुन्हा चव्हाण यांनी या महामार्गाच्या पाहणीचा फार्स उरकला.
21 दिवस उलटले, तरी ‘त्या’ चार मशीन आल्याच नाहीत
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी दोन अद्ययावत मशीन आणण्यात आल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून दिवसभरात अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम केले जात आहे. 20 दिवसांपूर्वीच्या दौर्यात रवींद्र चव्हाण यांनी अशा आणखी चार मशीन आणा असे आदेश ठेकेदाराला दिले. मात्र 14 जुलै रोजी केलेल्या दौर्याला 21 दिवस उलटून गेले तरीही ‘त्या’ चार जादा मशीन अद्यापि आलेल्या नाहीत.